देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी ब्लॉग सुरु करायचाय?

मराठी ब्लॉगांचा फेरफटका मारताना बरीच मंडळी प्रतिसादांमध्ये "मलाही मराठी ब्लॉग सुरु करायचाय! मराठी ब्लॉग सुरु करण्याकरिता काय करावे? त्यांत मराठीत कसे लिहावे?" ह्या आशयाचे प्रश्न विचारताना दिसतात. म्हणून म्हटले की हा प्रश्न सोडवण्याकरिता एक "कसे करावे" (HowTo) लेख लिहावा. तर हा तो लेख.

सर्वप्रथम ब्लॉगबद्द्ल माहिती:


"ब्लॉग" म्हणजे तरी काय?

"ब्लॉग" (Blog) हे "वेबलॉग" (Weblog) या शब्दाचे संक्षिप्त स्वरूप आहे. ब्लॉग किंवा वेबलॉग म्हणजे इंटरनेटवर नियमितपणे लिहिल्या जाणारी अव्यक्तिगत रोजनिशी. ह्याला मराठीतून "नोंदस्थळ" हा प्रतिस्पर्धी शब्द वापरता येतो. ब्लॉग किंवा नोंदस्थळातील लेखांना "पोस्ट" (Post) किंवा "नोंद" म्हटल्या जाते आणि ते उतरत्या कालाक्रमानुसार नोंदस्थळावर दाखविले जातात. ही रोजनिशी इंटरनेट किंवा आंतरजालावरील वाचकही वाचू शकतात आणि त्यावर आपले प्रतिसाद व्यक्त करू शकतात.


ब्लॉग का बरे लिहावा?

ब्लॉग सुरु करण्याची बरीच व्यक्तिगत कारणे असू शकतात. जर तुम्ही व्यवसायी लेखक किंवा कवी नसाल आणि चाकोरीबद्ध कागदी पुस्तके प्रकाशित करण्याची खटपट करायची नसेल किंवा वृत्तपत्रातील पत्रकार ह्या व्यवसायात नसाल आणि तरीही तुम्हाला तुमचे लेख, कविता, विचार इंटरनेटवरील वाचकांना वाचण्याकरिता प्रसिद्ध करायचे असेल तर "ब्लॉग" सारखे दुसरे सोपे माध्यम नाही. लेख प्रसिद्ध केल्यावर लगेच वाचक प्रतिसाद पाठवू शकतात. तुमच्या लेखांबद्दल कोणताही प्रतिसाद एवढ्या लवकर मिळणे दुसऱ्या माध्यमांतून तरी अशक्य आहे.

जरीही रोजनिशीपासून "ब्लॉग"च्या व्याख्येची सुरुवात होत असली तरी फक्त रोजनिशी ह्या कार्यापुरती मर्यादित न राहाता यावर बऱ्याच प्रकारचे लिखाण केल्या जाऊ शकते. वाटल्यास फक्त स्वयंपाकाच्या पाककृती प्रसिद्ध करा, प्रवासवर्णन लिहा, कविता प्रसिद्ध करा, फक्त गोष्टी लिहा किंवा कुठल्या गोष्टीवर आपले व्यक्तिगत विचार लिहा - ब्लॉग माध्यम आणि त्याचे वाचक तयार आहेत!


ब्लॉग मराठीतून का?

बरे, इंटरनेटच्या मराठी वाचकांमध्ये सुद्धा बरीच वाढ होत आहे. दिवसेंदिवस अधिकाधिक मराठीजन संगणकांचा वापर करून इंटरनेट किंवा आंतरजालावर फेरफटका मारायला तयार होत असतात. इंटरनेट वरील मराठी लेखन ह्यांपैकी बऱ्याच चोखंदळ मराठी वाचकांना आकर्षित करते. यावरही जर मराठी ही तुमची मातृभाषा किंवा बोली भाषा असेल तर आपले विचार मराठीत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याची महती समजावून सांगण्याची गरजच नाही.


ब्लॉग कुठे बनवायचा?

मराठी ब्लॉग विश्वावर तुमचा स्वतःचा ब्लॉग बनविण्याची सुविधा नाही. तुमचा ब्लॉग उघडण्याकरिता तुम्हाला ब्लॉग बनवता येणाऱ्या संकेतस्थळांवर स्वतःचे खाते उघडून तेथे ब्लॉग बनवता येईल. http://blogger.com किंवा http://wordpress.com अशा संकेतस्थळांवर तुम्हाला ब्लॉग बनविण्यासाठी खाते उघडता येतात.


ब्लॉग बनविण्यासाठी तयारी

मराठी ब्लॉग सुरु करण्याकरीता तुम्हाला खालील गोष्टींची तयारी करावी लागेल:

१) मराठी व्यवस्थित दिसते?
तुमच्या स्वतःच्या ब्राऊजर वरती तुम्हाला मराठी व्यवस्थित दिसते का? जर मराठी बरोबर दिसत नसेल तर "Devanagari Font Problem " ह्या दुव्यावरील लेख वाचा आणि त्याप्रमाणे तुमच्या संगणकावर दुरुस्ती करा.

२) ब्लॉग खाते

आता असे समजून चलू या की मराठी तुमच्या ब्राऊजर वर बरोबर दिसते.

ब्लॉगमध्ये लेख लिहिण्याआधी तुम्हाला ब्लॉग खाते किंवा ब्लॉग संकेतस्थळ सुरु करावे लागेल. जर तुम्हाला तुम्ही स्वतःच चालवलेल्या संकेतस्थळावर ब्लॉग स्थापित करायचा असेल तर प्रथम "Wordpress", "Pivot", "MovableType" किंवा असेच ब्लॉग चालवण्याकरिता बनविलेले सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या संकेतस्थळावर प्रस्थापित (इन्स्टाल) करावे लागेल. स्वतःचे संकेतस्थळ चालवायचे नसेल तर तुम्हाला ब्लॉगसाठी इंटरनेटवर असलेल्या पुष्कळ विनामूल्य किंवा खाते विकत घेऊन ब्लॉग उघडता येणाऱ्या संकेतस्थळापैकी एखाद्या संकेतस्थळावर आपले ब्लॉग खाते उघडता येईल. Blogger.com आणि Wordpress.com हे अशाच संकेतस्थळांपैकी काही विनामूल्य पर्याय आहेत. तसेच "TypePad" हे ब्लॉग खाते विकत घेऊन ब्लॉग सुरु करण्याचे संकेतस्थळ आहे.

३) मराठीत लिहिणे

मराठीमध्ये लेखन करण्यासाठी ह्या दुव्यावर पहा

आशा आहे की या माहितीचा बर्‍याच वाचकांना उपयोग होईल. आपल्या मराठी ब्लॉग सुरु करण्याच्या उपक्रमाला शुभेच्छा!

प्रतिक्रिया

blogspot madhe kase lihave ajunahi kalale nahi.

Sriveena P.

धन्यवाद

माहितिबद्दल धन्यवाद !!!!!!

ब्लाँगरवर मराथी कसे लिहायच?

क्रुपया सविस्तर माहिती द्यावी.

ब्लाँगरवर मराथी कसे लिहायच?

क्रुपया सविस्तर माहिती द्यावी.