उठ शहरातल्या माणसा..
कोंदटलेलं मन तुझं
भरारणा-या पावसात,
तुरुंगात सिमेंटच्या
ओल्याचिंब दिवसात.
आता थोडी भीड सोडून
झटक सारी मरगळ,
म्हणू दे कोणी काहीही
या भिंती आता उधळ.
बाहेर नीघ बेधडक
डांबरी रस्त्यावर ये,
जीव खाऊन पळ
स्वतःला शहराबाहेर ने.
डोंगरावरची चढ वाट
तुडव मऊ चिखल,
मोडणा-या इस्रीला,
कर जरा बेदखल.
डोंगराच्या माथ्यावरती
बरसणा-या पावसाला,
घट्ट मिठी मार जरा
स्वर्गसुखाच्या दिवसाला.
मुद्दाम पाय घसरव
मऊ गवतात लोळ,
डोळे रोखून बघ वर
बरसणारं आभाळ.
पून्हा शहरात येऊन
कोंडलेपण टोचून घे,
पण आधी शहरातल्या
माणसांवरती हसून घे.
कवी – बाबासाहेब जगताप.
९४०३६३२५६५
babasaheb_jagtap@webdunia.com