देवनागरी
Roman
Press F12 to toggle

"भिक नको पण...'

काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शासनाने एकीकडे दूध दरात एक रुपयाने वाढ केली; मात्र दुसरीकडे दूधवाढीसाठी लागणाऱ्या पशुखाद्यामध्येही भरमसाट वाढ करून शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे "भिक नको पण...' म्हणण्याची वेळ दूधउत्पादकांवर आली आहे.
दुधाला दरवाढ मिळावी म्हणून काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या वतीने काही नेत्यांनी तीव्र आंदोलने केली. या काळात हजारो लिटर दुधाची नासाडी झाली. त्याचा फटकाही दूधउत्पादकांना बसला. जवळजवळ आठवड्याभराच्या आंदोलनानंतर शासन दरबारी दाद मागून दुधाला एक रुपयाची वाढ मिळावी; पण हा निर्णय घेण्यासाठी शासनकर्त्यांना जवळजवळ दोन-अडीच महिन्यांचा कालावधी लागला.

एकीकडे दुधाचा दर एक रुपयाने वाढवला; पण पशुखाद्य दरवाढीवर कोणतेच निर्बंध नाहीत. पशुखाद्य उत्पादक करणाऱ्या कंपन्यांनी कधीही व कितीही दरवाढ करावी, अशी स्थिती आहे. दूध दरवाढीच्या अगोदर २०० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत मिळणारे पशुखाद्य दरवाढीनंतर सुमारे शंभर ते दीडशे रुपयांनी महागले आहे. पशुखाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालात म्हणजेच भुईमूग, सोयाबीन, सरकीमध्ये वाढ झाल्याने पशुखाद्याची वाढ झाल्याचे सांगितले जाते; मात्र हा कच्चा माल शेतातीलच असल्याने शेतकऱ्यास या कच्च्या मालाला किती दरवाढ मिळाली, हा संशोधनाचा विषय आहे.

दुधाला फक्त एक रुपयाची दरवाढ मिळाली असताना पशुखाद्य दरात मात्र वारंवार वाढ होत राहिली आहे. सध्या तर ४०० रुपयांस मिळणारी सरकी पेंड ६५० रुपयांवर गेली आहे. तसेच सर्वच पशुखाद्यांत भरमसाट वाढ झाली आहे; मात्र दुधाचा दर स्थिर राहिला आहे.

पावसाच्या हुलकावणीने आता चाराटंचाईचा प्रश्‍न भेडसावत आहे. खरीप हंगाम तर पूर्णपणे वाया गेला आहे. चाराटंचाईचा प्रश्‍न बिकट असतानाच यामध्ये भर म्हणून पशुखाद्यातही दरवाढ होत आहे. त्यामुळे जनावरांना पशुखाद्य वापरायचे, की नाही हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. पशुखाद्याशिवाय जनावरे पुरेसे दूध देत नाहीत, तर पशुखाद्य जनावरांना घालणे परवडत नाही. त्यामुळे दूधउत्पादक दुहेरी कोंडीत सापडल्याचे चित्र आहे.