नुकतेच माझ्या वाचनात महर्षी विनोद यांचे काही लिखाण आले. माननीय डॉ. ऋजुताताई विनोद यांच्यामुळे हे घडले. कित्येकदा आध्यात्मिक मजकूर आपल्या कानावरून जातो, पण तेसारे शब्द पुन्हा पुन्हा ऐकून, किंवा आपली ग्रहणशक्ती दुबळी असल्यामुळे त्याशब्दांचा अर्थ मेंदूपर्यन्त पोहोचतच नाही. पण या विषयावर इतरांशी चर्चा करताना आपले आपल्यालाच कित्येक मुद्दे उलगडत जातात, म्हणून असे मनात आले की या मराठी ब्लॉगद्वारा या विषयावर चर्चा करणारा एखादा गट तयार करावा.
महर्षि विनोद यांच्या संकेत-स्थळाविषयी माहिती
प्रिय नूतन, हा चर्चागट सुरु केल्याबद्दल धन्यवाद. http://www.maharshivinod.org या संकेतस्थळाला भेट दिली की, तुम्हाला दिसेल...महर्षि विनोद (१९०२-१९६९) आणि, विदुषी मैत्रेयी विनोद (१९०८-१९८१), यांच्या जीवनाविषयी व साहित्याविषयी जवळजवळ ६०० पाने अपलोड केलेली आहेत. शिवाय, त्यांचे कार्य पुढे चालू ठेवणार्या संस्थांविषयीही माहिती, या संकेतस्थळावर आहे. वर्षभर पुण्यात "शांति-मंदिर" येथे होणार्या विविध उपक्रमांची व त्या अनुषंगाने महर्षींनी लिहिलेल्या साधनासूत्रांविषयीच्या माहितीवजा बातम्या सुध्दा दिल्या आहेत. हे संकेतस्थळ आपण जरुर पहावे व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्या. ऋजुता Dr.Mrs.Rujuta Vinod.MD,PGDPC.
उपयुक्त संकेतस्थळ
धन्यवाद, आपण सुचविलेल्या संकेतस्थळावर अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. अनेक शंका दूर झाल्या. विशेषत: या संकेतस्थळावरील ‘संत-महात्म्यांची पुण्यतिथी . . . ’ बाबतची माहिती खूप उद्बोधक वाटली.
फ़क्त, या विषयात कित्येकदा वापरल्या जाणार्या काही वाक्प्रचारांचा व आधुनिक विज्ञानातील संकल्पनांचा ताळमेळ घालता येत नाही. उदाहरणार्थ, ‘ईश्वराचे मानवी देहामध्ये अवतरणे’ व शालेय विज्ञानात शिकवलेली ‘मानवी जीवाच्या जन्माची माहिती’ या दोन गोष्टींचा ताळमेळ कसा घालावा? ईश्वराच्या मानवी देहात अवतरण्याविषयी हजारो वर्षे, विविध धर्म-पंथांमध्ये दृढविश्वास आहे, त्याअर्थी ते अगदीच असत्य नसावे असेही एकीकडे वाटते. परंतु आधुनिक विज्ञानाच्या माहितीमध्ये जीवाच्या जन्माच्या तपशीलात ‘अवतार’ या संकल्पनेचा काहीच उल्लेख नसतो, हे कसे?
अवतार या संकल्पनेविषयी
Dr.Mrs.Rujuta Vinod.MD,PGDPC.
प्रिय नूतन, मी तुम्हाला वेळेवर उत्तर पाठवू शकले नाही त्याबद्दल क्षमा करावी.
अवतार या शब्दाचा अव्+तृ असा मूळ संधी आहे. तृ म्हणजे तारणे. अव म्हणजे खाली हे आपल्याला माहित असेलच. खाली म्हणजे मृत्यूलोकात. वर म्हणजे ७ स्वर्ग किंवा त्याच्याही वरील लोक (कृपया संदर्भासाठी व्यासमहर्षींनी कलियुगातील मानवांच्या उपयोगासाठी लिहिलेली पुराणे विशेषतः श्रीमदभागवतपुराण वाचावे.) यातील आध्यात्मिकदृष्ठ्या श्रेष्ठ देवतांचे अंश मृत्यूलोकांतील जीवांना देवयानमार्गावर (संदर्भ-गीता) नेण्यासाठी मानवदेह धारण करतात. जन्म घेतल्यानंतर पहिली काही वर्षे सद्गुरुच्या मार्गदर्शनाखाली कठोर साधना केल्यानंतर सद्गुरूंच्या आदेशानुसार इतर जिज्ञासू-मुमुक्षूंना ते मार्गदर्शन करतात.
मानवी संसाराला भवसागर म्हणले आहे. सुख-दुःखाच्या लाटेबरोबर जीव वरखाली हेलकावे घेत असतात. यातून तारणार्या व्यक्तिला सद्गुरु म्हणतात. ते इतर माणसांसारखे दिसत असूनही वेगळे कसे असतात याविषयी महर्षींनी त्यांच्या एका साधनासूत्रात सविस्तर लिहिले आहे.
त्याविषयी नंतर लिहिते. वरील स्पष्टीकरण वाचून आपल्याला काय वाटले ते जरुर कळवावे.