देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सायबर गुन्हेगारी टाळण्याचे सोपे प्रतिबंधक उपाय

झटपट विनासायास श्रीमंत होण्याची लालसा, विशिष्ट ज्ञानाचा दुरुपयोग, कायद्यातील पळवाटा तसेच काम करण्याच्या पद्धतीत असणार्‍या त्रुटी शोधून त्यावर स्वतःच्या फायद्या साठी कुरघोडी करण्याची मानसिकता आज समाजात वाढली आहे. वारंवार वेगवेगळ्या स्वरुपात बघायला मिळणारी हीच मानसिकता सायबर विश्वात विविध सामाजिक व आर्थिक गुन्हे घडवून आणते आणि कंप्यूटर वर आर्थिक व्यवहार करणारे ह्या गुन्ह्यामध्ये नाहक फसतात.

कंप्यूटर वापरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्या बरोबर वाढणार्‍या सायबर गुन्ह्यामध्ये आपण फसू नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. अलीकडे 30 नोव्हेंबर हा दिवस दर वर्षी कंप्यूटर सुरक्षा दिन म्हणून जगभर मनवला जातो. सामान्य नागरिकात कंप्यूटर सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम स्तुत्य आहे.

आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मुळे आपण घरबसल्या विविध गोष्टी विकत घेऊ शकतो तसेच बँकाचे व्यवहार देखील करू शकतो. कंपन्यांचे समभाग तसेच म्यूचुयल फन्डामध्ये खरेदी विक्री करू शकतो. ह्या सर्व गोष्टी करतांना काय खबरदारी घ्यायला पाहिजे? त्यासाठी नागरिकाना हे सर्व कंप्यूटरच्या पडद्याआड घडते कसे हे समजणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

आर्थिक सेवा पुरवणारी बॅंक वा संस्था ग्राहकांच्या सोयीसाठी इंटरनेटवर एक विशिष्ट संकेत स्थळ (web site) तयार करते. सायबर क्षेत्रातील सर्व आर्थिक व्यवहार हे तुम्ही इंटरनेटला जोडलेल्या कुठल्याही पर्सनल कंप्यूटरवरुन करू शकता. आर्थिक सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला इंटरनेट मधील त्या संकेतस्थळा ला भेट द्यावी लागते. त्यासाठी तुम्ही इच्छेप्रमाणे कुठलाही browser उदाहरणार्थ, इंटरनेट एक्सप्लोरर, मोझीला, फायरफॉक्स् किंवा ओपेरा प्रोग्रॅम वापरु शकता.तुम्हाला पाहिजे असलेल्या सेवेचा ग्राहक बनण्यासाठी लागणारे सोपस्कार तुम्ही पूर्ण केल्यानंतर त्या संकेत स्थळावर व्यवहार करण्यासाठी संस्था तुम्हाला परवलीचा शब्द (password) व खुण (login id) कुरियर ने तुमच्या घरच्या पत्त्यावर पाठवते.

सायबर विश्वातील बहुतेक आर्थिक गुन्हे पासवर्ड व login आयडी चोरून घडतात. बर्‍याचश्या एक्सपर्ट कंप्यूटर वापरणार्‍यानासुद्धा त्यांच्या नकळत पासवर्ड व login आयडी कसा चोरला
जाऊ शकतो याची नीटशी कल्पना नसते. बॅंक वा संस्था अशा प्रकारे घडलेल्या गुन्ह्यातील आर्थिक नुकसानीची जबाबदारी घेत नाहीत.

काही संस्था तुम्हाला दर 2 आठ्वड्यानी तुमचा पासवर्ड बदलण्यास भाग पाडतात. आपण काय ही नसती कटकट म्हणून त्रागा करतो. पण ही सायबर गुन्हे टाळण्यासाठी
महत्वाची बाब आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आर्थिक व्यवहार करण्यासाठी संस्था त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाचा इंटरनेटवरचा पत्ता (URL) तुम्हाला पाठवते. तो पत्ता जर https:// ह्या शब्दाने चालू होत नसेल तर सावधान! http:// ह्या शब्दाने चालू होणारे इंटरनेटवरचे सर्व URL सुरक्षित नसतात. http:// पत्ता असणार्‍या संकेत स्थळावर तुम्ही टाइप केलेला सर्व मजकूर इंटरनेटला जोडलेली कुठलीही व्यक्ती थोड्या प्रयत्नांती वाचू शकते व त्या माहितीचा गैरवापर करू शकते.

सायबर क्षेत्रातील सर्व आर्थिक व्यवहार https:// संकेतस्थळावरुनच करायला पाहिजेत त्याकरिता संकेतस्थळाला भेट देण्याकरिता संस्थेने पाठविलेला URL अचूक रित्या टाइप करणे आवश्यक आहे.
सुरक्षित संकेत स्थळाची एक खात्री लायक खूण म्हणजे Browser वरचे कुलूपाचे चिन्ह होय. प्रत्येक वेळी ते तपासायला विसरू नका.

काही हुशार सायबर चोर मंडळी आजकाल जवळपास हुबेहुब दिसणारी पण खोटी संकेत स्थळे तयार करतात. तुमचा फोन वा ई-मेल आयडी प्रयत्नपूर्वक मिळवून तुम्हाला खोट्या संकेतस्थळांचा URL पाठवतात. तुम्हाला ई-मेल द्वारे वा फोनने तुमचा पासवर्ड जुना झाला आहे व पाठवलेल्या खोट्या URL वर तो बदलायला गळ घालतात. सर्व संकेत स्थळांमध्ये पासवर्ड बदलण्यासाठी प्रथम तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड टाइप करावा लागतो. नंतर नवीन पासवर्ड दोन वेळा टाइप करावा लागतो. त्या खोट्या संकेतस्थळावर तुम्ही जर तुमचा पासवर्ड बदलला तर तुमचा जुना व खरा पासवर्ड आयता तुमच्या हातूनच चोरांच्या हाती पडतो. बोगस कागदपत्रे देऊन बँकाची खाती उघडणे अजूनही शक्य असल्यामुळे तुमचा जुना पासवर्ड संस्थेच्या मूळ अधिकृत संकेतस्थळावर वापरुन तुमचे पैसे तुमच्या खात्यातून एका तात्पुरत्या बोगस खात्यात पाठवून नंतर लंपास केले जाऊ शकतात. ह्या प्रकारच्या सायबर चोरीला phishing असे म्हणतात. खोट्या संकेतस्थळावर तुम्ही बदलेला पासवर्ड संस्थेच्या मूळ संकेतस्थळावर चालत नाही हे तुमच्या लक्षात आले तर सावधगिरीची पावले तुम्ही लगेच उचलू शकाल.

तरुण वर्गात चॅट करणे खूप वाढले आहे. सायबर चोर तुमच्याशी दोस्ती वाढवून (social engineering) तुमचा पासवर्ड व इतर खाजगी माहिती मिळवू शकतात. तुम्ही चॅट वर टाइप केलेला कुठलाही मजकूर त्या वेळी इंटरनेटवर असणार्‍या सर्व प्रयत्नशील व्यक्तीना कळू शकतो हे फार थोड्या लोकांना माहीत आहे. म्हणूनच कंप्यूटर सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही महत्वाची माहिती चॅट करताना टाइप करू नका. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड नंबर, PAN कार्ड नंबर, तुमची जन्म तारीख इत्यादी. तुम्ही जर चॅट करतांना माइक्रोफोन व वेब कॅमेरा वापरत असाल तर त्यामार्फत तुम्हाला नकळत तुमच्या हालचाली, फोनवरची बातचीत, तुम्ही की बोर्ड वरची कुठली बटने दाबलीत हे सायबर चोर थोड्या प्रयत्नांती समजू शकतो व त्या माहितीचा उपयोग करून तुमचा पासवर्ड पण चोरला जाऊ शकतो. यावर सोपा उपाय म्हणून माइक्रोफोन व वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.

आता एका अत्यंत महत्वाच्या व फार कमी लोकाना माहीत असलेल्या गोष्टीकडे वळू या.
कंप्यूटर शी थोडा फार संबध असणार्‍या प्रत्येक व्यक्तीला कंप्यूटर वाइरस व त्यापासूनचे धोके माहीत झाले आहेत. परंतु आजकाल कंप्यूटर वायरस पेक्ष्या स्पाय वेअर चा धोका खूप वाढला आहे. स्पाय वेअर हे कंप्यूटर प्रोग्रॅम जेम्स बॉंड च्या कार्य पद्धतीचे कंप्यूटर रूप होय. तुम्ही एखादी विशिष्ट वेब साईट काही क्षण जरी उघडली तरी तुमच्या कंप्यूटर मध्ये स्पाय वेअरचा शिरकाव होऊ शकतो. काही ई-मेल उघडल्यावर लगेचच तुमच्या कंप्यूटर मध्ये स्पाय वेयर शिरू शकते. तसेच काही गेम्स व प्रोग्रॅम्स् डाउनलोड करताना पण स्पाय वेयर शिरू शकते. अश्या विविध प्रकारांनी स्पाय वेअर तुमच्या नकळत तुमच्या कंप्यूटर मध्ये शिरतात आणि तुम्ही कंप्यूटर वर काय करता याची पूर्ण खबरबात ठेवतात. तुमची खाजगी माहिती, काय पासवर्ड टाइप केले, कुठले प्रोग्रॅम वापरले, कुठल्या वेब साईट ना भेटी दिल्या ही माहिती स्पाय वेअरच्या साह्यानी सायबर चोरांच्या हाती लागू शकते.

काही प्रकारचे स्पाय वेअर तर भयंकर धोकादायक कंप्यूटर प्रोग्रॅम तुमच्या कंप्यूटर मध्ये कायम स्वरूपी टाकु शकतात. त्याने तुमचा कंप्यूटर चा स्पीड कमी होऊ शकतो तर कधी कधी तुमच्या कंप्यूटर चा पूर्ण ताबा पण जाऊ शकतो. काही स्पाय वेअर हे इतक्या खुबीने स्वतःला लपवतात की त्याना शोधणे व काढणे मुश्कील होऊन बसते.

काय घाबरलात ना? नको तो कंप्यूटर आणि नको ते इंटरनेट असेच तुम्हाला आता वाटत असेल. पण थांबा. ह्या सर्वांवर सुलभ उपाय आहे. कंप्यूटर आणि इंटरनेट चे फायदे पाहता कंप्यूटर न वापरणे हा पर्याय नसून आपण कंप्यूटर वापरताना थोडी काळजी घेतली तर ह्या सायबर चोरांवर मात करणे अजिबात अवघड नाही.

• कंप्यूटर वापरताना जागरूक राहा. तुमच्या कंप्यूटर मध्ये मधून मधून काही आपसूक स्वयंचलित घडामोडी होतात का हे तपासा. अधून मधून कंप्यूटर हळु स्पीड ने चालतो आहे का ह्याकडे लक्ष द्या. मुख्य म्हणजे गंमत म्हणून अनोळखी व अनावश्यक गेम्स व प्रोग्रॅम लोड करू नका.
• स्पाय वेअर व वाइरस यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी तुमच्या कंप्यूटर मध्ये चांगला Anti Virus व Anti Spy ware प्रोग्रॅम बसवून घ्या. नॉर्टन व मॅकाफी हे दोन चांगले व खात्रीलायक Anti Virus व Anti Spy ware प्रोग्रॅम आहेत. दर रोज नवीन वाइरस व स्पाय वेयर निघत असतात. त्यावर तोडगा पण उपलब्ध असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी दर आठवड्याला Anti Virus व Anti Spy ware च्या अद्ययावत signatures डाउनलोड करून हे स्पाय वेअर व वाइरस विरुद्ध चे आपले मुख्य हत्यार कार्यरत ठेवले पाहिजे.
• अनोळखी वेब साईट ना भेटी देण्याचे टाळा. तुमच्या browser चे सुरक्षा कवच medium - high ठेवा.
• दर 2 किंवा 3 दिवसांनी कंप्यूटर च्या वापरामुळे जमा झालेली तात्पुरती डाउनलोडेड माहिती व जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाकत चला.
• दर 2 आठवड्यानी तुमचे पासवर्ड बदला. पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील. पासवर्ड मध्ये तुमच्या गाडीचा नंबर, फोन नंबर, जन्म तारीख, घरातल्या लोकांची नावे यांचा वापर टाळा.
• चॅट करताना कुठलीही महत्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा.
• आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुसर्‍याच्या कंप्यूटर वरुन करू नका. तुमचा स्वतःचा लॅपटॉप तुम्ही गरज पडल्यास सायबर केफे मधे वापरु शकता. त्या आधी तुमच्या लॅपटॉप मध्ये लेटेस्ट Anti Virus व Anti Spy ware प्रोग्रॅम आहेत की नाही याची खात्री करून घ्या.

सायबर विश्वातील आर्थिक गैर व्यवहार टाळता येऊ शकतात हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. गुन्हेगारी मानसिकता आपण बदलू शकत नाही. तसेच कंप्यूटर सारख्या प्रभावी माध्यमाकडे सुद्धा पाठ फिरवू शकत नाही. अशा परिस्थितीत वर दिलेले उपाय तुम्हाला कंप्यूटर वर सुरक्षित आर्थिक व्यवहार करण्यास खचीत मदत करतील.