देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कॉलेज कविता

(१) बाहुल्याचे दु:ख

ऊर भरून आला,
भरून आले डोळे,
आकाशातील निळ्या,
ढग झाले काळे.

मन्मनाच्या स्मृती,
दाटल्या ढगाहून गडद,
काळानेही भयाण अशा,
सोडली आपली हद्द.

पण कोण आडवे त्याला?
कर्दनकाळच तो!
हरेक त्याच्यापुढे,
नतमस्तक होतो.

व्यक्ती गेली, स्मृती राहिली,
देवाच्या भतुकलीची क्रीडा भोवली,
जणू, प्रकाश जाऊन,
उरे अंधाराची सावली. . .

(२) कोंदण
हिरव्या हिरव्या रंगपटावर
शुभ्र कोंदण कुणी काढले?
लता-वेलींना आच्छादून ते
लाज राखण्या धाऊन आले.

रोज बदलते शुभ्र वस्त्र ते
रोज नवे ते कोंदण कुठले?
कणाकणांनी वाढत जाऊन
मृदुल फ़ुलांनी कोंदण केले.

सडा शिंपुनी स्वप्राणांचा
मऊ बिछाने कोणी केले?
गंध घेऊनी, धुंद होऊनी
फ़ुलाफ़ुलांनी बलिदान केले

सजवायाला या विश्वाला
शृंगारवीर हे कुठले आले?
आले जेथुन, तेथुन आले . . .
एक चिरंतन वरदान मिळाले

शुचिर्भूत त्या शुभ्रपणात
गंधप्रीत त्या अग्रजनांत
पाहुनी मजला -
आत्मशांतीचे दर्शन झाले
मन माझे गंधसुखाने ओले झाले!